
महात्मा गांधींच्या हत्येनंतर सन १९४८ साली संपूर्ण देशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. महात्मा गांधीचा मारेकरी एक ब्राम्हण माथेफिरू होता.म्हुणुन संपूर्ण ब्राम्हण समाजालाच वेठीला धरले गेले. बहूजन समाजाकडून आपल्याच निरपराध बांधव ज्यांच्या या हत्येशी कसलाच संबंध नव्हता त्यांची घरे पेटवली जात होती.या दंगलीचे लोन पाटण गावात येऊन पोहचले होते.चारशे-पाचशे लोकांचा जमाव ब्राम्हणपुरी पेटविण्याच्या इरादयाने हातात पलिदे घेऊन पाटणच्या बाजारतळावर जमला होता.त्यांच्या हातात काठ्या,कुराडी,तलवारी होत्या.
त्यावेळी पाटणमध्ये जयसिंगराव दिनकरराव माने-देशमुख (वय २५ वर्षे,अवविवाहीत) फौजदार होते. एक तरुण तडफदार व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा लोकिक होता.त्यांना ही बातमी समजताच क्षणाचाही विलंब न लावता ते जमावाला सामोरे गेले.त्यानी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.तुम्ही परत फिरा,आगी लाऊ नका , आगी लावायच्या असतील तर तुम्हाला माझ्या प्रेतावरून जावे लागेल असे त्यांनी निर्वाणीच्या भाषेत जमावाला सांगितले . परंतु जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जमावाला पांगविण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला. परंतु जमाव पांगण्याऐवजी अधिकच बिथरला. तारेच्या कुंपणातून वाकून येणाऱ्या फौजदार माने-देशमुखांवर जमावाने तलवारीचे घाव घातले आणि एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. एक पोलीस अधिकारी आपल्या हातून मारला गेला हे लक्षात येताच जमाव भीतीने पांगला गेला. पाटण गाव जाळपोळीतून वाचले गेले परंतु त्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याला स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली.
अशा या हुतात्मा वीर फौजदार माने देशमुख यांच्या बलिदानाची आठवण म्हणून त्यांच्या नावाने एक आदर्श माध्यमिक विद्यालय सुरु करण्याचा निर्णय त्यावेळी पाटण परिसरातील काही प्रभावी व्यक्तींनी घेतला. स्वर्गीय श्रीमंत दादासाहेब पाटणकर , स्वर्गीय आण्णासाहेब जगताप,स्वर्गीय अॅड मारुलकर , स्वर्गीय मालक देशपांडे, स्व.शंकरराव बहुलेकर , बाळासाहेब मोटे यांच्या पुढाकाराने हे पाटणमधील एकमेव ज्ञानमंदिर सन १९५० पासून सुरु झाले.
एका हुतात्मा पोलिसाच्या नावाचे पोलिसाचा अभिमान वाटावा असे ऐतिहासिक स्मारक , तेही ज्ञानमंदिराच्या रुपात असलेले एकमेव विद्यालय आहे.